प्रभात वृत्तसेवा पुणे – दि. १ जानेवारी २०२६ रोजी मौजे पेरणे येथे होणारा २०९ वा भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन अभिवादन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या वर्षी सुमारे २० लाख अनुयायी येण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्याला जास्तीत जास्त आंबेडकरी अनुयायांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भीमा कोरेगाव विजयस्तंभ समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले आहे. सुरक्षेसाठी ‘फेस स्कॅनिंग’चा वापर यंदा सुरक्षेवर विशेष भर देण्यात आला असून, समाजकंटक आणि चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीस पहिल्यांदाच ड्रोनद्वारे फेस स्कॅनिंग यंत्रणेचा वापर करणार आहेत. सुरक्षिततेसाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा १३ हजारांहून अधिक जणांचा ताफा तैनात असेल. पिण्याचे पाणी, पार्किंग आणि शौचालयांची संख्या वाढवून नियोजन अधिक दर्जेदार करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला दिलेल्या भेटीला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने हे वर्ष ‘मानवंदना शताब्दी वर्ष’ म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्त विशेष अभिवादन कार्यक्रम होणार आहे. तसेच, महार रेजिमेंटच्या सुमारे ३,००० निवृत्त सैनिकांकडून लष्करी शिस्तीत राष्ट्रगीतासह मानवंदना दिली जाईल. यावेळी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.