प्रभात वृत्तसेवा पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकत्रित लढण्यासंदर्भात अद्याप प्रस्तावच आलेला नाही. त्यामुळे एकत्रित लढण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीतील अन्य पक्षांशी चर्चा करून २३ डिसेंबरला पहिली यादी जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी शिंदे पुण्यात आले होते. महापालिकेच्या १६५ जागांसाठी २७७ इच्छुकांचे अर्ज आले आहेत.मागील सगळ्या निवडणुका मविआ म्हणूनच आम्ही लढवल्या होत्या. सेना आणि मनसे एकत्र आले, तर काँग्रेस मविआमध्ये राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या सगळ्या बाजूंनी चर्चा सुरू असल्याचे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून निर्णय घेताना स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि शिवसेनेबरोबर प्राथमिक चर्चा केली आहे. बदलत्या राज्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेस आणि शिवसेनेची भूमिका एकमेकांबद्दल काय असेल, याबाबत आम्हाला राज्यपातळीवर निर्णय घ्यावा लागेल. सेना आणि काँग्रेस यांच्यात एकमत झाले नाही, तर पर्याय काय, याचा विषय होणे आवश्यक आहे. आम्ही दुसऱ्या कोणत्याही पर्यायांचा शोध घेतला नाही, असे शिंदे यांनी सांगितले. शनिवार संध्याकाळपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि कोअर कमिटीने काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी चर्चा करून ठोस निर्णय घ्यावा. वाटपात आलेल्या जागा यावर एकमत करून निर्णय घ्यावा. त्यानंतर पुढे जावे, अशा सूचना केल्याचेही शिंदे यांनी नमूद केले. पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या अध्यक्षांनी खा. सुप्रिया सुळे यांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची भेट घेऊन, एकत्रित लढण्यासंबंधी प्रस्ताव ठेवल्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, की पिंपरी-चिंचवडमध्येही मी बैठक घेणार आहे. जयंत पाटील, सुळे आणि मी मिळून निर्णय घेणार आहे. गृहखाते नापास झाले की काय? एका अवैध प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाला मुख्यमंत्र्यांनी क्लिनचीट दिली आहे. याउलट पार्थ पवार, माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई होईल, असे संकेत आहेत, याविषयी बोलताना शिंदे म्हणाले, की मुख्यमंत्र्यांना सरकार चालवायचे आहे, त्यामुळे मित्रपक्षांना ते नाराज करत नाहीत. कदाचित त्यांना दिल्लीहून ते सांगितले असावे. कोयना परिसरातील दुर्गम ठिकाणी एका छोट्याशा गावात एमडीच्या अवैध फॅक्ट्री सापडते, ही बाब गंभीर आहे. पोलीस यंत्रणा काय करते, तसेच गृहखाते नापास झाले की काय, असाही प्रश्न पडतो.