प्रभात वृत्तसेवा पुणे – आजचे जागतिक राजकारण हे कधीकाळच्या ‘आघाडीच्या राजकारणा’सारखे झाले आहे. जगात सध्या कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही, त्यामुळे परिस्थिती सातत्याने बदलत आहे. अशा अस्थिर वातावरणात राष्ट्रीय हित जोपासण्यासाठी भारताला अधिक चपळ आणि सतर्क राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी पुण्यात केले. राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवात डिप्लोमसी टू डिस्कोर्स या विषयावरील सत्रात जयशंकर बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक यांनी संवाद साधला. बदलत्या जागतिक समीकरणांवर भाष्य करताना डॉ. जयशंकर म्हणाले की, सध्याच्या काळात अमेरिकेशी संवाद साधणे आव्हानात्मक झाले आहे, तर चीनचे व्यवस्थापन करणे ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया बनली आहे. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियावरील दबाव वाढत असताना, त्यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. तसेच, जपानला सोबत घेऊन जाण्याचा वेग वाढवणे आणि युरोपला महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार बनवणे ही भारताची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.शेजारील राष्ट्रांशी असलेल्या संबंधांबाबत बोलताना ते म्हणाले, आपले शेजारी आपल्यापेक्षा लहान आहेत, ते आपल्याशी संबंधित आहेत. त्यांच्याकडेही राजकारण होते. ते कधी आपल्यावर टीका करतात, कधी आपले कौतुक करतात. कारण, आपण त्यांच्या राजकारणाचाही भाग आहोत. अशावेळी त्यांच्याशी संबंध स्थिर राहतील याची खात्री करावी लागते. श्रीलंकेत आलेल्या चक्रीवादळावेळी भारतानेच सर्वप्रथम मदत केली. कोरोना काळात शेजारी राष्ट्रांना लस पुरवली. युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर गहू, पेट्रोल, खतांचा पुरवठा थांबल्यावर ते भारताने उपलब्ध करून दिले. त्यामुळे कुटुंबाप्रमाणे जबाबदारीने वागणे महत्त्वाचे आहे. परराष्ट्र धोरण ठरवताना निवड करावी लागते, स्पष्टता असावी लागते. मात्र, आपल्यासाठी हितकारक काय हे पाहिले पाहिजे. भारताचा ‘ब्रँड’ उंचावतोय आपण कधी बोलायचे, कधी नाही बोलायचे हे परिस्थितीवर अवलंबून आहे. आताच्या स्पर्धात्मक काळात आपण बोललो नाही, तर दाबून टाकले जाईल. त्यामुळे आवाज उठवण्याचीही गरज आहे. मात्र, अंदाज घेऊन बोलले पाहिजे. देशाची ओळख नेतृत्त्वाने, दूरदृष्टीने होते. त्याच्या अंमलबजावणीसाठी लोक आहेत. दूरदृष्टी, नेतृत्त्व, आत्मविश्वासामुळे फरक पडतो. जगातील संधी भारतासाठी खुल्या होत आहे. जगात भारताचा ‘ग्लोबल ब्रँड’ निर्माण झाला आहे. त्याचा फायदा घेऊन तरुणाईने जगाकडे ‘ग्लोबल वर्कप्लेस’ म्हणून पाहिले पाहिजे, असेही डॉ. जयशंकर यांनी नमूद केले.