प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग २५ ची मतमोजणी सुरू असताना उमेदवारांना दिलेल्या यादीतील मतदान यंत्रांचे क्रमांक आणि मतमोजणीसाठी आणलेले मतदान यंत्रांचे क्रमांक जुळत नसल्याचा आरोप करत ऍड. रुपाली पाटील आक्रमक झाल्या. त्यांनी मतमोजणी केंद्रावर आरडाओरडा करत आक्षेप घेतला. त्यांनी जाळीच्या रेलिंगवर चढून मतमोजणी कक्षात जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या सगळ्या गोंधळात सकाळी ११.२० पासून ते दीड वाजेपर्यंत मोजणी थांबवावी लागली. वास्तविक या प्रभागाचा निकाल पहिला लागणे अपेक्षित असताना निकाल लागण्यास दुपारचे दोन वाजले.प्रभाग क्रमांक २५ ची मतमोजणी सुरू असताना ऍड. रुपाली पाटील यांनी मोजणीवर आक्षेप घेतला. त्यांचा असा आक्षेप होता, की उमेदवारांकडे असलेल्या यादीतील मतदान यंत्रांचे क्रमांक आणि मतमोजणीसाठी वापरात असलेल्या मतदान यंत्रांचे क्रमांक परस्परांशी जुळत नाहीत. मतदान यंत्रांच्या क्रमांकांबाबत उमेदवारांकडील यादीच्या आधारे आक्षेप घेण्यात आला होता. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश काळे यांनी त्यांच्या सर्व शंकांचे सविस्तर निरसन केले.उमेदवारांकडील यादी ही मूळ यादीशी क्रॉस- चेक केली असता, असे स्पष्ट झाले, की यादीतील माहिती अचूक असून, प्रभाग क्रमांक २५ आणि २७ यांच्या यादीतील पानांची अदलाबदल ही उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून झाली होती. उमेदवारांच्या प्रतिनिधींनी प्रभाग २५ च्या यादीला प्रभाग २७ च्या मतदानयंत्रांच्या क्रमांकाची यादी जोडली होती. त्यामुळे ती जुळत नव्हती. प्रभाग २५ ची यादी समजून जी यादी उमेदवारांचे प्रतिनिधी सांगत होते, ती यादी प्रभाग २७ च्या यादीशी तंतोतंत जुळत होती. या सगळ्याची माहिती आक्षेप घेणाऱ्या उमेदवारांना दाखवण्यात आली. त्यानंतर ते निघून गेले आणि त्यानंतर दुपारी दीडच्या सुमाराला मतमोजणी प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली.