प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागाच्या थकबाकी वसुलीसाठी पालिका प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मिळकतकर अभय योजनेचा उद्या (गुरुवार) अखेरचा दिवस आहे. महापालिका प्रशासनाकडून १५ नोव्हेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ही योजना राबविली होणार होती. या योजनेत आतापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ६४१ कोटींचा महसूल जमा झाला आहे. योजनेचा अखेरचा दिवस असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.दोन महिन्यांसाठी राबविण्यात आलेल्या या योजनेतून एक हजार कोटी रुपयांपर्यंतची वसुली अपेक्षित होती. मात्र, आतापर्यंत महापालिकेला केवळ ६४१ कोटी ३३ लाख रुपयांचीच वसुली करता आली आहे. ही रक्कम अभय योजनेतील आतापर्यंतची सर्वाधिक असली, तरी अपेक्षित उद्दिष्ट गाठण्यात महापालिका अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीवरील दंडाच्या रकमेत ७५ टक्के सवलत देण्यात येत आहे. यापूर्वी २०१५-१६, २०१६-१७, २०२०-२१ आणि २०२१-२२ या अभय योजनांचा लाभ घेतलेल्या थकबाकीदारांना यंदाच्या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही, असे सुरुवातीला स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, नंतर अचानक जुन्या लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, तरीही अपेक्षित वसुलीचा टप्पा गाठता आलेला नाही. महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिलपासून मिळकतकराची देयके वितरित केली जातात. सप्टेंबरअखेरपर्यंत मिळकतकर न भरल्यास त्यावर दरमहा दोन टक्के व्याज अथवा दंड आकारला जातो. सध्या महापालिकेकडे सुमारे साडेपाच लाख मिळकतधारकांची एकूण १३ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत आहे. त्यातच महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील मिळकतकर वसुलीला राज्य सरकारने स्थगिती दिली असल्याने, त्या भागातील नागरिकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आलेली नाहीत.पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या चार अभय योजनांपैकी २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ४५८ कोटी ६७ लाख रुपयांची वसुली झाली होती. यंदा दोन महिन्यांसाठी ही योजना राबविण्यात आली असून, योजना संपण्यास दोन दिवस शिल्लक असताना ६३६ कोटी ३३ लाख रुपये जमा झाल्याचा दावा महापालिकेने केला आहे. मंगळवार, १३ जानेवारी रोजी एकाच दिवशी ६० कोटी रुपयांची वसुली झाली, तर १४ जानेवारीला ७० कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे १३ जानेवारीअखेर एकूण २४९१ कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.