प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात एक अंशाने वाढ झाल्यामुळे मागील आठवडाभरापासून कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. रविवारी (दि. १४) हवेली परिसरात सर्वात कमी ७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर अन्य परिसरात किमान तापमान ९ अंशाच्या पुढे नोंदविले गेले. त्यामुळे थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरासह उपनगरातील किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे थंडीचा पारा ७ अंशापर्यंत खाली आला. परिणामी पुणे जिल्ह्यात थंडीची लाट आली आणि कडाक्याच्या थंडीचे पुणेकर गारठले. पहाटे धुक्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, गेल्या २४ तासांत शहरातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे ७ ते ८ अंशावर असलेला थंडीचा पारा ९ ते १२ अंशाच्या पुढे गेला. परिणामी शहरातील हुडहुडी काहीशी कमी झाली आहे. तर पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, हवामान कोरडे राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान हवेली ७.३, पाषाण ९.२, बारामती ९.३, शिवाजीनगर ९.४, माळीण १०.१, दौंड १०.४, आंबेगाव ११.६, कोरेगाव पार्क १३.६, भोर १४.३, चिंचवड १४.५, वडगावशेरी १५.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.