प्रभात वृत्तसेवा पुणे – रिपब्लिकन पक्ष भाजपचा सच्चा साथीदार आणि महायुतीतील भागीदार आहे.महायुती परिपूर्ण असून यापुढे भागीदार वाढवू नका, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले.महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२ जागा मिळाव्या अशी मागणीही त्यांनी केली. पक्षाने नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबंडकर महाविद्यालयाच्या मैदानावर केलेल्या संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर प्रभारी शैलेन्द्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, अशोक कांबळे, अशोक गायकवाड, महिपाल वाघमारे, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे, शाम सदाफुले, महिला शहराध्यक्ष हिमाली कांबळे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, विशाल शेवाळे आदी उपस्थित होते. भाजपाच्या साथीने पक्षाची देशभर बांधणी करत आहे. आज ईशान्य भारतामध्येही पक्षाने स्थान मिळवले आहे. आंबेडकरी विचाराच्या पक्षांमध्ये महाराष्ट्रात मतभेद दिसतात, असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटील म्हणाले, महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढणार असून सत्तेत योग्य वाटा रिपब्लिकन पक्षाला मिळेल.