प्रभात वृत्तसेवा पुणे – कोणत्याही उद्योग आणि उद्योगपतींच्या विरोधात नाही, तर विशिष्ट पद्धतीच्या मक्तेदारीच्या विरोधात आहे. टाटा, अंबानी किंवा हिंदुजा समूहाला आपले स्वत:चे उद्योग उभे करण्यासाठी ५०-६० वर्षे लागली, तिथे केवळ १० वर्षांत एखादी व्यक्ती एवढी मोठी कशी होते? एकाच उद्योगपतींची ‘ग्रोथ’ (वाढ) होत आहे, यापेक्षा ती कशी होतेय, हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे. हेच धोकादायक आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला.मुंबईतील सभेत ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत गौतम अदानींच्या प्रकल्पांची कारभाराची चिरफाड केली होती. त्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. या टीकेवर राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्र सरकार या एकाच व्यक्तीसाठी ‘रेड कार्पेट’ टाकत आहे. सिमेंट, स्टील, विमानतळ आणि बंदरे अशा सर्वच क्षेत्रांत एकाधिकारशाही निर्माण होत असून, भविष्यात हाच माणूस संपूर्ण देशाला वेठीस धरू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अदानींनी नवी मुंबईचे विमानतळ वगळता एकही विमानतळ स्वतः बांधलेले नाही. चालती-बोलती विमानतळे आणि बंदरे त्यांना गन पॉइंटवर देऊन किंवा दबावाखाली हस्तांतरित करण्यात आली आहेत, असा आरोपही त्यांनी केला.जेव्हा एकाच कंपनीचे वर्चस्व वाढते, तेव्हा देशाला मोठा धोका निर्माण होतो. अदानींना अर्थसहाय्य कुठून झाले? कोणत्या बँकांना त्यांना कर्ज द्यायला लावले? उद्या जर हे साम्राज्य विस्कळीत झाले, तर देशाची अर्थव्यवस्था कोलमडेल आणि लाखो लोकांच्या नोकऱ्या जातील, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले.