प्रभात वृत्तसेवा पुणे – पुण्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हिजन तयार करून आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी केली जाणार आहे. पुणे हे देशातील सर्वोत्तम शहर बनावे, यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत स्पष्ट सांगितलेपुणे महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ कोंढवा येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. या वेळी फडणवीस यांनी पुण्याच्या विकासाबाबतच्या अनेक प्रकल्पांबाबत भाष्य केले. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी ३२ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यात प्रामुख्याने ५४ कि.मी.चे भुयारी मार्ग विकसित करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. संपूर्ण शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जाणार आहे. यातून पुण्याला मेट्रो सिटीचा दर्जा प्राप्त व्हावा, यासाठी प्रयत्न केली जातील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. शहरातील सर्व भागात समान पाणीपुरवठा व्हावा, या अनुषंगाने आगामी काळात योग्य ते नियोजन करून पाणीपुरवठ्याचे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सध्या ४० टक्के पाणी गळती होत असून, ती १० टक्क्यांपर्यंत आणता येईल, यासाठी आवश्यक ते काम हाती घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांसाठी ४४ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचीही अंमलबजावणी होणार आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले आहे. देशात सर्वांत कमी ९ टक्के रस्ते पुण्यात आहेत. त्यामुळे नवीन रस्ते मार्ग विकसित केले जाणार आहेत. यातून पुण्याचा चेहरामोहराच बदल्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे. पुणे शहर ग्रोथ हब म्हणून ओळखले गेले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.