प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केली ई-केटरींग सेवा पुणे – रेल्वे प्रवासात प्रवाशांना आपल्या आवडीच्या किंवा नामांकित हाॅटेल/रेस्टाॅरंटमधून जेवण मागविण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग व पर्यटन महामंडळ लिमिटेड (आयआरसीटीसी) ने ई-केटरींग सेवा सुरू केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जागेवर बसून जेवणाची ऑर्डर करता येणार असून, प्रवाशांनी निवडलेल्या वेळेत जेवण आसनावर पोहचणार आहे. रेल्वे प्रवासात एकवेळचे जेवण पार्सल आणले जाते. काही प्रवाशांना वेळेअभावी डबा आणणे शक्य होत नाही. त्यावेळी जेवण किंवा भूक भागेल असे पदार्थ घ्यायचा म्हटल्यावर ते कोणत्या ब्रॅंडचे आहे, चांगले आणि स्वच्छ असेल का? जेवण केल्यावर त्रास तर होणार नाही ना, असे एक ना अनेक विचार डोक्यात येतात. बाहेरील पदार्थ खाण्याचे अनेकजण टाळतात. विशेषत: लांब पल्ल्याच्या प्रवाशात ही अडचण अधिक जाणवते. त्यावेळी माहितीतील किंवा नामांकित ब्रॅंड असलेल्या हाॅटेलचे पदार्थ असल्यावर प्रवाशी खरेदी करत असल्याचे आढळले. त्यामुळे आयआरसीटीसीने प्रायोगीक तत्वावर ई-कॅटरिंग सेवा सुरू केली. त्यासाठी संकेतस्थळासह टोल फ्री क्रमांक, मोबाईल ॲप आणि व्हाॅट्सॲपद्वारे ऑर्डर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. या सेवेमुळे प्रवाशांना प्रवासात विश्वासार्ह ब्रँड्स, अधिकृत रेस्टॉरंट्समधून पसंतीचे अन्न निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. प्रवाशांचा याला चांगला प्रतिसाद मिळत असून, आयआरसीटीसीने ही सेवा सक्षमपणे राबविण्यास सुरवात केली आहे. देशातील ३०० हून अधिक रेल्वे स्थानकांवर ही सेवा उपलब्ध असून, त्यामध्ये भारतीय, दक्षिण भारतीय, चायनीज, कॉन्टिनेंटल तसेच बिर्याणी व इतर स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. समूहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीकडून ग्रुप ऑर्डर सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांना आसन सोडण्याची गरज नाही. त्यांना जागेवर अधिकृत विक्रेत्यांकडून आणि आवडीच्या हाॅटेलमधून स्वच्छ व दर्जेदार जेवण उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये प्रवाशांना ऑनलाईन प्री-पेड किंवा कॅश ऑन डिलिव्हरी हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.