प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून, सलग चौथ्या दिवशी हुडहुडीने पुणेकर चांगलेच गारठले आहे. शहर परिसरातील एनडीए परिसरात सर्वात कमी ७.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पाषाण येथे ९.१ आणि शिवाजीनगरला ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. मागील चार ते पाच दिवसांपासून किमान तापमानात झपाट्याने घट झाली असून थंडीचे पुनरागमन झाले. एनडीए, पाषाण, कात्रज, धायरी, खडकवासला यासह हवेली आणि शहराच्या मध्यवर्ती भागात थंडीची लाट आली. त्यामुळे पुणेकर गारठले असून, शनिवारी दिवसभर ऊन असले तरी हवेत गारवा जाणवत होता. पहाटे धुके पडले होते. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील आकाश निरभ्र राहील. सकाळी धुके पडण्याची शक्यता असून, किमान व कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.