प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी तापमान स्थिर असल्याने थंडीचा जोर कायम आहे. वर्षअखेरीस थंडीचा जोर वाढण्याची शक्यता असून शुक्रवारी (दि. २६) हवेलीत सर्वात कमी ८.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर आणि पाषाणसह जिल्ह्यातील बारामती, माळीण परिसरातील थंडीचा पारा एका आकड्यावर नोंदविला गेला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून किमान तापमानात लक्षणीय घट होऊन थंडीचा कडाका सुरू झाला. १५ ते १६ अंशावर असलेला थंडीचा पारा ६ अंशाच्या खाली गेला. दोन दिवस लाट राहील आणि जाईल असे वाटत असताना, आठवडाभर थंडीच्या लाटेने मुक्काम ठोकला. संपूर्ण महिनाभरात दोन ते तीन दिवस किमान तापमान १० ते १२ अंशापर्यंत पोहचले. अन्यथा शहरातील थंडीचा पारा ७ ते ९ अंशावर असल्यामुळे पुणेकर यंदा चांगलेच गारठले आहे. वर्षाअखेरीस थंडीचा जोर वाढत असून, नवीन वर्षातही हुडहुडी भरणारी थंडी असेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शुक्रवारी (दि. २६) शहरातील हवेली, शिवाजीनगर, पाषाण परिसरात किमान तापमान ८ अंशापर्यंत खाली नोंदविल्यामुळे गारठा चांगलाच वाढला. तसेच जिल्ह्यातही थंडीचा पारा ९ अंशापर्यंत खाली आल्यामुळे दाट धुके आणि हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील, किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात थंडीचा लाट कायम राहील. किमान तापमान हवेली ८.३, बारामती ९, माळीण ९.४, पाषाण ९.५, शिवाजीनगर ९.९, तळेगाव दाभाडे १०, आंबेगाव १०.५, दौंड १०.८, निमगिरी ११.४, भोर १२, हडपसर १२.४, कोरेगाव पार्क १४.३, चिंचवड १४.९, वडगावशेरी १५.४, मगरपट्टा १५.६ अंश सेल्सिअस