प्रभात वृत्तसेवा पुणे – गेल्या २४ तासात किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. लोणीकाळभोर येथे सर्वात कमी ९.४ तर तळेगाव आणि माळीण येथे ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.मागील आठ दिवसांपासून शहरासह उपनगरांत थंडीचा पारा कमी- अधिक होत आहे. परिणामी दोन दिवस कडाक्याची थंडी, तर दोन दिवस थंडीचा जोर कमी, अशी परिस्थिती होत आहे. त्यात दुपारी उन्हामुळे थंडीपासून काहीसा दिलासा मिळत आहे. वर्षाअखेर थंडीचा जोर कमी झाला असला, तरी नवीन वर्षात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. बुधवारी (दि. ३१) पहाटे धुके आणि थंडीचा कडाका होता. दुपारनंतर उन्हाचा हलकासा चटका जाणवत होता. किमान तापमानात वाढ झाल्यामुळे रात्रीच्या थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे.दरम्यान, आज शहरासह जिल्ह्यातील लोणीकाळभोर येथे ९.४, तळेगाव दाभाडेला ९.८, माळीण ९.९, पाषाण १०.३, शिवाजीनगर १०.८, बारामती ११.२, दौंड ११.४, आंबेगाव ११.५, हडपसर १३.१, भोर १३.३, चिंचवड १४.७, कोरेगाव पार्क १४.८, वडगावशेरी १५.७, मगरपट्टा १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.