प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, गेल्या ४८ तासांत किमान तापमान १४ अंशाच्या पुढे गेले आहे. परिणामी पहाटेचा गारवा सोडला तर शहरातून थंडी गायब झाली आहे. उपनगरातील काही भागात थंडीचा हलकाचा जोर आहे. सोमवारी (दि. ५) हवेली परिसरात १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.नवीन वर्षात थंडीचा जोर वाढेल अशी शक्यता असताना, हवामानातील बदलामुळे गेल्या चार ते पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात झपाट्याने वाढ झाली. ८ अंशापर्यंत पारा खाली आल्यामुळे शहरातील बहुतांश भागात थंडीच्या लाटेने हुडहुडी भरली होती. मात्र, आठवडाभरात किमान तापमानात घट होण्याएवजी वाढ झाली. ढगाळ वातावरणामुळे पाच दिवसांत तब्बल सहा अंशाने वाढ झाल्याने बहुतांश भागातील थंडी गायब झाली. पाषाण, एनडीए, वारजे, खडकवासला, जांभूळवाडी यासह डोंगर आणि धरणक्षेत्र परिसरात थंडी जाणवत असून, शहराच्या मध्यवर्ती भागासह कोरेगाव पार्क, मगरपट्टा, हडपसर, येरवडा परिसरात थंडीचा जोर ओसरला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील, कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीचा जोर कमी-अधिक राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. किमान तापमान पाषाण १४.७, शिवाजीनगर १५.४, हवेली १४.४, माळीण १४.५, बारामती १५.६, दौंड १५.६, तळेगाव १५.७, गिरीवन १६.८, हडपसर १७, कोरेगाव पार्क १८.४, वडगावशेरी १९.१ आणि चिंचवड २० अंश सेल्सिअस