प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह उपनगरातील किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर ओसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, हवामानातील बदलाचा परिणाम पुणेकरांना सहन करावा लागत आहे. साथीच्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील किमान तापमान १२ ते १३ अंशाच्या पुढे गेला आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात तीन ते चार अंशाने वाढ झाली आहे. परिणामी थंडीची लाट ओसरली असून, ढगाळ वातावरणामुळे सकाळी धुके आणि हलकासा गारवा जाणवतो. दिवसभरातील उन्हाचा चटकाही कमी झाला असून, पुढील दोन ते तीन दिवस शहरातील हवामानात फारसा बदल होणार नाही. कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.