प्रभात वृत्तसेवा पुणे – शहरासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून थंडीच्या लाटेने भरलेली हुडहुडी गेल्या २४ तासात थोडी कमी झाली आहे. किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट झाल्यामुळे ७ अंशांच्या खाली गेलेले किमान तापमान आज ९ अंशाच्या पुढे नोंदविले आहे. शहराच्या पूर्व भागासह जिल्ह्यात काही ठिकाणी किमान तापमान १३ ते १४ अंशांच्या पुढे गेल्यामुळे थंडीचा कडाका काहीसा कमी झाला आहे. शहरातील किमान तापमान ६ ते ७ अंशांपर्यंत खाली आले आणि थंडीची लाटेने पुणेकरांमध्ये हुडहुडी भरली. एक ते दोन दिवस लाट राहील, असे वाटत असताना आठवडाभरापासून मुक्काम केलेल्या थंडीने लाटेने पुणेकरांना आजारी पाडले. साथीच्या आजारांनी डोके वर काढत, सांधेदुखीसह अस्थमा आणि अन्य आजार असलेल्या रुग्णांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत शहरासह उपनगरातील किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे थंडीचा पारा ९ अंशांवर आला आहे. परिणामी हुडहुडी भरणाऱ्या थंडीने पुणेकरांना दिलासा दिला असून, शहर परिसरातील पाषाण येथे सर्वात कमी ९.२, शिवाजीनगर येथे ९.९, तर जिल्ह्यातील बारामती येथे ९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. अन्य भागात दोन अंकी किमान तापमानाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसात शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे राहील. सकाळ आणि संध्याकाळी थंडी, तर दिवसभर उन्हाचा चटका असे वातावरण राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील आजचे किमान तापमान पाषाण ९.२, बारामती ९.६, शिवाजीनगर ९.९, दौंड १०.५, तळेगाव दाभाडे १०.९, माळीण ११.५, आंबेगाव ११.९, हडपसर १२.१, कोरेगाव पार्क १३.८, भोर १४.३, चिंचवड १५, वडगावशेरी १६.१, गिरीवन १६.२ अंश सेल्सिअस.