प्रभात वृत्तसेवा पुणे – हवामान बदलामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीची लाट ओसरली आहे. गेल्या ४८ तासांत किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे पारा १२ अंशाच्या पुढे गेला. परिणामी थंडीचा जोर कमी झाला असून, ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळत आहे.नवीन वर्षात थंडीचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. मात्र, हवामानातील बदलामुळे मागील तीन ते चार दिवसांत किमान तापमनात लक्षणीय घट झाली आहे. ८ अंशावर असलेले किमान तापमान आज (दि. ३) १२.६ अंशाच्या पुढे गेले आहे. परिणामी थंडीची लाट ओसरली असून, जोरही कमी झाला आहे. त्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, ढगाळ वातावरणामुळे हलकीशी थंडी जाणवेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील काही प्रमुख भागातील किमान तापमान माळीण १२.६, हवेली १२.७, पाषाण १३.५, तळेगाव दाभाडे १४.१, शिवाजीनगर १४.२, दौंड १५.४, बारामती १५.८, हडपसर १६.१, भोर १६.६, कोरेगाव पार्क १७.८, मगरपट्टा १८.५ आणि वडगावशेरी येथे १८.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.