प्रभात वृत्तसेवा पुणे – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाल्यामुळे थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे. गेल्या २४ तासांत एक अंकी असलेला थंडीचा पारा दोन अंकावर पोहचला. ८ अंशावरील किमान तापमान १० अंशाच्या पुढे नोंदविले गेले. गुरूवारी (दि. १) शहरातील पाषाण येथे १०.६ अंश सेल्सिअस तर जिल्ह्यातील दौंड येथे १०.२ किमान तापमानाची नोंद झाली. शहरासह जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून किमान तपमानात चढ-उतार होत असल्यामुळे थंडीचा जोरही कमी-अधिक होत आहे. मात्र, गेल्या ४८ तासांत किमान तापमानात सातत्याने घट होत असल्यामुळे ८ अंशावर असलेले किमान तापमान आज (दि. १) १० अंशाच्या पुढे नोंदविले गेले, त्यामुळे नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी पहाटेची थंडी कमी जाणवली. तर, दिवसभर उन्हाचा चटका जाणवत असल्यामुळे पुणेकरांना थंडीपासून काहीसा दिलासा दिला. मात्र, दुपारी १ ते ३ दरम्यान उन्हाच्या चटका चांगलाच जाणवू लागला. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस हवामान कोरडे राहील, किमान तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडीचा पारा ११ ते १२ अंशावर जाईल आणि थंडीचा जोर आणखी कमी होईल. कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. प्रमुख भागांतील किमान तापमान दौंड १०.२, बारामती १०.४, पाषाण १०.६, तळेगाव दाभाडे १०.८, शिवाजीनगर १०.९, माळीण ११.१, आंबेगाव ११.५, हडपसर १२.६, कोरेगाव पार्क १४.७, चिंचवड १५, वडगावशेरी १५.८, मगरपट्टा १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.