प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग तिसऱ्या दिवशी किमान तापमानात वाढ झाल्यामुळे शहरासह जिल्ह्यातील थंडीचा जोर कमी झाला. तर शुक्रवारी (दि. २) दुपारी दोननंतर शहरात ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे एन हिवाळ्यात पाऊस पडतोय का असे वातावरण झाले होते. त्यामुळे दिवसभर थंडी, ऊन आणि ढगाळ वातावरणाचा लपंडाव पहायला मिळाला.मागील तीन ते चार दिवसांपासून शहरातील किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात एक ते दोन अंशाने तापमानात वाढ झाल्यामुळे थंडीचा पारा १२ अंशाच्या पुढे गेला. त्यामुळे हुडहुडी भरणारी थंडी कमी झाली. हवामानातील बदलामुळे आज दुपारी अचानक ढगाळ वातावरण झाले. त्यामुळे दुपारी जाणवणारा उन्हाचा चटका कमी झाला आणि पावसाची शक्यता वाटली. ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानातही घट झाली. हवेली येथे ११.९ तर बारामती परिसरात १२.७, शिवाजीनगरला १३.५, हडपसर येथे १५.३ तर कोरेगाव पार्क येथे १६.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामानात फारसा बदल होणार नसून, कमाल व किमान तापमानात एक ते दोन अंशाने कमी-अधिक होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.