– प्रारूप मतदारयादीवर हरकतींसाठी आज शेवटचा दिवस पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांच्या काढलेल्या आरक्षण सोडतीवर अखेर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले आहे. या आरक्षणावर २९ हरकती आल्या होत्या. या सर्व फेटाळल्या आहेत. त्यामुळे ११ नोव्हेंबर रोजी काढलेली आरक्षण सोडतच अंतीम असणार आहे. त्यामुळे प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पूर्ण झाला असून आता केवळ प्रभाग निहाय प्रारूप मतदारयादीचा शेवटचा टप्पा राहिला आहे. ही मतदारयादीही अंतिम झाल्यानंतर निवडणूकीच्या पूर्व तयारीच्या सर्व प्रक्रीया पूर्ण होणार आहे. महापालिकेसाठी यंदा १६५ नगरसेवक असणार असून ४ सदस्यांच्या प्रभागात या निवडणुका होणार आहेत. त्यात ४० प्रभाग ४ सदस्यांचे असून १ प्रभाग पाच सदस्यांचा आहे. महिलांसाठी ८३ जागा राखीव असून एसटीसाठी २ तर एससीसाठी २२ आणि ओबीसींसाठी राखीव असलेल्या ४४ जागांसाठी आरक्षणाची सोडत काढली होती. शेवटचा दिवस महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप मतदारयादी २० नोव्हेंबर रोजी जाहीर केली होती. यावर हरकती घेण्यासाठी प्रशासनाने २७ नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती. मात्र, इच्छुक उमेदवारांना यादी मिळण्यास झालेला उशीर आणि यादीत मोठया प्रमाणात गोंधळ असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्याने आयोगाने हरकती आणि सूचनांसाठी ३ डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती. ही मुदत उद्या, बुधवारी संपत असून आतापर्यंत प्रारूप मतदारयादीवर १२ हजार ७३८ हरकती आल्या आहेत. यातील ९० टक्के पेक्षा अधिक हरकती एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात मतदार गेल्याच्या, तसेच बाहेरील प्रभागातील मतदार आपल्या प्रभागात आल्याच्या आहेत. या हरकतींची खातरजमा करून त्यानुसार पालिकेकडून बदल करून त्या १० डिसेंबर रोजी जाहीर केल्या जाणार आहेत. त्यानंतर २२ डिसेंबर रोजी मतदार केंद्रनिहाय याद्या जाहीर केल्या जाणार आहेत.