मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्धीस २७ डिसेंबर मुदत पुणे – राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक मततदार याद्यांच्या कार्यक्रमास निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पुण्यासह राज्यभरात मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. मतदार याद्यांचे विभाजन करताना मोठ्या प्रमाणात एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात जाणे, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींनुसार याद्यांमध्ये सुधारणा करून त्या आयोगास सादर करणे, तसेच जाहीर करण्यास महापालिकांना कालावधी हवा आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महापालिकांनी आयोगाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे महापालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवरही सुमारे २२ हजार हरकती प्राप्त झालेल्या आहेत. आयोगाकडून देण्यात आलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यासाठी आता १० डिसेंबर ऐवजी १५ डिसेंबर ही मुदत असणार आहे, तर मतदान केंद्राच्या ठिकाणी याद्या प्रसिद्ध करण्यासाठी १५ डिसेंबरऐवजी २० डिसेंबर ही मुदत असणार असून, मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिद्ध करण्यासाठी २२ डिसेंबर ऐवजी २७ डिसेंबर ही नवीन मुदत असणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनास मतदार याद्या दुरुस्तीसाठी आणखी वेळ मिळणार आहे.