प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे – हिंजवडी, वाघोली, शिक्रापूर येथील वाहतूककोंडी रोखण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कडून आता गतीने पावले उचलली जात आहे. पुणे-मुंबई बाह्यवळण मार्गावर विविध ठिकाणी अंडरपास करणे तसेच राष्ट्रीय महामार्गालगत सेवा रस्ते बांधणे, शिक्रापूर व वाघोली येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी रस्ते बांधण्याचे नियोजनदेखील प्राधिकरणाकडून करण्यात येत आहे. प्राधिकरणाच्या कार्यालयात प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासन, एमआयडीसी, रस्ते विकास महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. हिंजवडी-पिरंगुट-घोटावडे राजमार्गामधील हिंजवडी फेज- 1 ते हिंजवडी फेज- 3 दरम्यानचा रस्ता व त्यावरील एलिव्हेटेड कॉरिडोरसाठी एमआयडीसीमार्फत जिल्हाधिकारी यांना भूसंपादन प्रस्ताव सादर केला जाणार. हिंजवडी मेट्रो लाईन- 3 खालील रस्त्यांचे खड्डे तातडीने भरून डांबरीकरणासह रस्ता सुस्थितीत एमआयडीसीकडे हस्तांतरित करण्याच्या मेट्रोला सूचनादेखील प्राधिकरणाच्या आयुक्तांनी केल्या आहेत. तसेच, हिंजवडी परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पीएमआरडीए निधी देणार असून, धोकादायक धूळ व बेदारकार डंपर चालविणाऱ्यांविरुद्ध तसेच बेकायदा आरएमसी प्लॅन्ट व बांधकाम व्यावसायिकांवर कारवाईच्या सूचना आयुक्तांनी दिल्या.