दोघांनी दागिने चोरून थाटला हिमाचलमध्ये संसार, प्रियकरास झाली अटक संजय कडू पुणे – कोवळ्या वयातील प्रेम, आकर्षणातून एकत्र येण्याचा निर्णय किती महागात पडू शकतो, याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. शिक्षण अपूर्ण, नोकरी नाही, उत्पन्नाचा कोणताही मार्ग नाही अशा परिस्थितीतही संसार थाटण्याचा त्यांचा धाडसी पण चुकीचा निर्णय त्यांना गुन्हेगारीच्या मार्गावर घेऊन गेला. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली ही फसलेली प्रेमकथा. कथेतील तरूण अवघ्या १८ वर्षांचा तर तरूणी १७ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन. कोरेगाव पार्कमदील एरा नामांकित महाविद्यालयात दोघेही कनिष्ठ विभागात शिकावयास. शिकता-शिकता दोघांमध्ये भावनिक नाते निर्माण झाले. या नात्यातून फुललेले कोवळे प्रेम. दोघांनी आपण एकत्र आयुष्य जगायचे ठरवले. हा निर्णय घेताना ना वय त्यांच्या बाजूला होते ना शिक्षण. भावनेच्या भरात दोघांनीही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मुलीने स्वतःच्या घरातून दहा तोळे, तर मुलाने तब्बल चाळीस तोळे सोने चोरले. या दागिन्यांसह दोघेही घरातून पळून गेले. जाण्यापूर्वी त्यांनी मोबाईल बंद केले, मुलीने तर सीमकार्डही फेकून दिले. त्यांचा पत्त लागत नसल्याने पालकांनी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना सुरुवातीला कोणताही मार्ग काढता आला नाही. या प्रकरणाचा तांत्रिक तपास करताना महत्त्वाचे धागे हाती लागले. मुलीने चुलत बहिणीच्या नावावर सीमकार्ड घेतल्याचे निष्पन्न झाले. त्याआधारे केलेल्या तांत्रिक तपासातून दोघांचे लोकेशन थेट हिमाचल प्रदेशातील एका शहरात आढळले. लोकेशनच्या आधारे कोरेगाव पार्क पोलिसांचे पथक त्या शहरात पोहोचले. तेथे एका सदनिकेत हे दोघे पती-पत्नीप्रमाणे राहत असल्याचे आढळले. छापा टाकल्यानंतर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. चोरलेले दागिने विकून त्यांनी भाड्याने घर घेतले होते, फ्रीज, कॉट, फर्निचर आणि संसारोपयोगी साहित्य खरेदी केले होते. तेथे दोघेही संसार करत होते. पोलिसांनी वयाची तपासणी केली तेव्हा मुलगा कायद्याने सज्ञान (१८ वर्षे पूर्ण) असल्याचे, तर मुलगी अल्पवयीन (१७ वर्षे ८ महिने) असल्याचे स्पष्ट झाले. दोघे चार महिने थांबले असते तर हातून गुन्हा घडला नसता. मुलगी अल्पवयीन असल्याने तरुणावर पॉस्को, अपहरणासह गंभीर गुन्हे दाखल केले असून त्याला अटक केली आहे. पोलीस पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे माग काढत दोघांना हिमाचल प्रदेशातून ताब्यात घेतले. मुलगा सज्ञान असल्याने त्याच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. — संगीता जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे