पुणे – शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्याच्या निर्णयाविरोधात शुक्रवारी हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुणे जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. शासनाने टीईटी परीक्षा बंधनकारक करण्याचा निर्णय रद्द करण्यासाठी हालचाली न केल्यास ९ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतर सहकुटुंब मुंबईतील आझाद मैदानावर भव्य मोर्चा काढण्याबाबतचा शासनाला इशाराही देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करावी आदी प्रलंबित प्रश्नांसाठी शाळा बंद ठेऊन हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे समन्वयक शिवाजी खांडेकर व बाळासाहेब मारणे यांच्यासह शिक्षण समितीचे नंदकुमार होळकर, संस्थाचालक शिक्षण मंडळाचे विजय कोलते मुख्याध्यापक संघटनेचे नंदकुमार सागर, के. एस. डोमसे, सचिन डिंबळे, शिवाजी कामठे आदींनी मोर्चात सहभाग घेऊन शासनाच्या धोरणावर टीका केली. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदनही देण्यात आले. शिक्षक म्हणून २० ते २५ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकाला टीईटी परीक्षा अनिवार्य करणे अन्यायकारक आहे. जिल्हाधिकारी पदावर काम करणारे अधिकारी सेवा दिल्यानंतर पुन्हा युपीएससी परीक्षा देत नाहीत. मग शिक्षकांना टीईटी परीक्षा का? आमदार, खासदारांना पेन्शन लागू होते. मग शिक्षकांना का डावलता, असा प्रश्न शिवाजी खांडेकर यांनी विचारला. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.