महापालिका आयुक्तांकडून आदेश पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणांच्या झाडणकामांसाठी प्रशासनाने काढलेल्या निविदा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. परिमंडळ चार अंतर्गत काढलेल्या निविदांसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेत काळ्या यादीत टाकलेले ठेकेदार, आर्थिक क्षमता नसलेल्या कंपन्यांना पात्र ठरविले गेले असल्याच्या तक्रारी आल्यानंतर याची तातडीनं चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच या प्रकरणी गैरव्यवहार आढळल्यास संबधितांवर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. गेल्या वर्षी प्रशासनाने १४ क्षेत्रीय कार्यालयांसाठी झाडणकामांच्या निविदा काढल्या होत्या.मात्र, त्यात रिंग झाल्याचे आढळल्याने तत्कालीन आयुक्तांनी निविदा रद्द करून पुन्हा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता पुन्हा कोंढवा- येवलेवाडी, हडपसर- मुंढवा, वानवडी-रामटेकडी तीन क्षेत्रीय कार्यालयांत अशी घटना घडली आहे. ठेकेदार निश्चित करताना एका ठेकेदाराला परराज्यात एका घोटाळ्याप्रकरणी काळ्या यादीत टाकले आहे. त्याला पात्र ठरविल्याने त्यावर हरकत घेण्यात आली आहे. परिमंडळ चारमधील झाडणकामाच्या निविदेसंदर्भात माझ्याकडे तक्रारी आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त पवनती कौर यांना याची चौकशी करून योग्य ते निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. – नवल किशोर राम ( महापालिका आयुक्त)