शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांची माहिती पुणे – अगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आजपासून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविणार आहे. पक्षाचे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना महायुती म्हणून भाजप सोबत लढण्यास आग्रही असली तरी त्याबाबत अद्याप दोन्ही पक्षांकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे पक्षाकडून सर्व जागांसाठी उमेदवारी अर्ज मागविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले होते, त्यानंतर शिवसेनेत फूट पडून दोन पक्ष निर्माण झाले आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, काही नगरसेवक अद्यापही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असले तरी निवडणुकीच्या तोंडावर ते शिवसेना अथवा भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा आहे. महापालिकेसाठी पक्षाकडून संघटनात्मक बांधणीला सुरूवात करण्यात आली असून भाजपसोबत युती झाल्यास पक्षाला ३५ ते ४० जागांची मागणी असणार आहे. मात्र, तूर्तास पक्षाकडून सर्व जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. मनसेचा आज होणार निर्णय ? सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांना अर्ज देण्यास तसेच अर्ज स्विकारण्यास सुरूवात केली असली तरी अद्याप मनसेकडून ही प्रक्रीया सुरू करण्यात आलेली नाही. त्यावर निर्णय घेण्यासह, अगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी आज (बुधवार) शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीत इच्छूकांना कधीपासून अर्ज द्यायचे याबाबत अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले.