प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याआधीच जागावटपावरून शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहे. मात्र, वादाची ठिणगी पेटवणारा कोण? पक्षात कोण शिवसैनिकांची डोकी भडकवत आहे, गटा-तटाचे राजकरण कोण करते, यावर पक्षाने गांभीर्याने लक्ष देऊन लगाम लावणे आवश्यक असल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. भाजप केवळ १५ जागा देऊन आमची चेष्टा करत आहे. हे जागावाटप सन्मानजनक होऊ शकत नाही. पालिकेच्या ४१ प्रभागात शिवसेनेतून निवडणूक लढविण्यासाठी सक्षम उमेदवार असताना युतीची काय आवश्यकता, युती करायचीच तर ४० पेक्षा अधिक जागा मिळाव्या. अशी मागणी शिवसेनेतील पदाधिकारी करत असून, आता तर पक्षातीलच नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप सुर झाले आहेत. शुक्रवारी (दि. २६) शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या बंगल्यासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत पदाधिकाऱ्यांवर टीका केली. जे पदाधिकारी एकला चलो रे चा नारा देतात, त्यांनी खरच ४१ प्रभागांचा अभ्यास केला का? निवडणुकीचे गणित आखले आहे का? की केवळ इच्छुकांना संधी मिळावी, पैसा खर्च व्हावा आणि जेवढे येतील त्यात समाधान मानायचे अशा मानसिकतेतून हा अट्टाहास सुरू आहे, हा प्रश्न आहे. गेल्या तीन निवडणुकांमधील संख्याबळ पाहिले तर शिवसेनाला जास्तीत जास्त २१ जागा जिंकता आल्या असून त्याही युतीमध्ये. २०१२ मध्ये १४ तर २०१७ मध्ये १० जागांवर समाधान मानावे लागले. त्यावेळी भाजप-शिवसेना युती नव्हती. २०२२ मध्ये शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत एक नगरसेवक आला. पाच नगरसेवक भाजपमध्ये गेले तर उरलेले तीन नगरसेवकही निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आल्यामुळे शिवसेनेची स्थिती नाजूक झाली आहे. शिवसेनेकडे एक तर ठाकरे शिवसेनेकेडे सध्या एकही माजी नगरसेवक नाही. असे असतानाही शिवसेना युतीमध्ये ३५ जागांची मागणी करत असून, किमान २५ ते ३० जागा मिळाव्या यासाठी अट्टाहास करत आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेला किती जागा देणार हे पुढील २४ तासात स्पष्ट होईल. त्यानंतर युती टिकणार की तुटणार यावर निर्णय होईल. भाजपा-शिवसेना युती व्हावी, सन्मानजनक जागावाटप व्हावे यासाठी शिवसेना नेते आणि वरिष्ठ पदाधिकारी प्रयत्न करत आहे. काही पदाधिकारी युती होवू नये म्हणून मुंबईवारी करून पक्षश्रेष्ठींना भेटत आहे. त्यातच काही पदाधिकाऱ्यांनी थेट नेत्यांच्या घरावर आंदोलन करत एकला चलो चा नारा दिला आहे.त्यातून शिवसेनेतील अंतर्गत कलह उफाळून येऊ लागले असून, त्यामध्ये शिवसैनिक भरडला जात आहे. एवढेच काय शिवसेनेत येण्यास इच्छुक असलेले उमेदवारही कुंपणावर बसून आहेत.