पुणे – रविवार पेठ – नाना पेठ या दाट लोकवस्तीच्या भागात पदयात्रा आणि घरोघरी भेट देत प्रभाग क्रमांक २३ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार ॠतुजा तेजस गडाळे यांच्याकडून मतदारांशी संवाद साधला जात आहे. अवघ्या काही दिवसांतच ॠतुजा यांच्यासह इतर उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यास प्राधान्य दिल्याने मतदारांकडून त्यांच्या अपेक्षा आपुलकीने मांडल्या जात आहेत. या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून, मतदार आपल्याला संधी देतील, असा विश्वास गडाळे यांनी व्यक्त केला आहे. मिश्र लोकवस्तीचा भाग असलेल्या या पेठांमध्ये भाजपकडून स्वच्छ प्रतिमा असणारे उमेदवार दिले आहेत. सुसंस्कृत, सुशिक्षित तरुण महिला चेहरा म्हणून ॠतुजा यांना क-सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी देत पक्षाने उत्तम सोशल इंजिनिअरिंगचा समन्वय साधला आहे. प्रचारासाठी ॠतुजा मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या, त्यांना महापालिकेकडून आवश्यक असलेल्या सुविधांचा आढावा घेत आहेत. याशिवाय केंद्र शासन, राज्य शासन, तसेच महापालिकेच्या माध्यमातून भाजपने सर्वसामान्यांसाठी राबविण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत. भविष्यात महिलांसह सर्वसामान्यांना महापालिकेच्या माध्यमातून या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन गडाळे देत असून, मतदारांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.