प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या पश्चिम रिंगरोडचे काम प्रगतीपथावर असून, पुढील दोन वर्षांत हे काम पूर्ण करण्याचा निर्धार महामंडळाकडून व्यक्त करण्यात येत आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडचे काम हाती घेण्यात आले आहे. महामंडळाकडून हे काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांत केले जात असून, पश्चिम टप्प्याचे काम सुमारे २० टक्क्यांपर्यंत झाले आहे. आता या कामाला वेग आला असून, मेअखेर महत्त्वाची कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पश्चिम टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांची अर्थात डिसेंबर २०२७ अखेर अशी मुदत देण्यात आली आहे. त्या मुदतीत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती वसईकर यांनी दिली. तर पूर्व टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी मे २०२८ची मुदत देण्यात आली आहे. त्या वेळी संपूर्ण रिंगरोड पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन महामंडळाकडून करण्यात येत आहे.पूर्वेकडील टप्प्यात एनएचआयने पुणे संभाजीनगरदरम्यान ग्रीन कॅरिडोरचे काम हाती घेतले आहे. हा प्रस्तावित रस्ता आणि रिंगरोड काही ठिकाणी एकत्र येत असल्यामुळे नगर रस्त्यापासून सोलापूर रस्त्याला आणि पुढे पुणे-बंगळुरू रस्त्याला जोडणाऱ्या रिंगरोडचे ३१ किलोमीटर रस्त्याचे काम प्राधिकरणाने करावे, असे यापूर्वी ठरले होते. परंतु, मध्यंतरी प्राधिकरणाने निर्णयात पुन्हा बदल करीत हे काम महामंडळानेच करावे, असे सुचविले. त्यानुसार हा रस्ता पुन्हा महामंडळाकडे वर्ग करण्यात आला आहे. लवकरच पूर्व रिंगरोडचेही काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले.