प्रभात वृत्तसेवा पुणे – पुणे पुस्तक महोत्सवाचा रविवारी अभूतपूर्व उत्साहात समारोप झाला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी तिसरा विश्वविक्रम प्रस्थापित करून पुणेकरांनी वाचन संस्कृतीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा नवा आदर्श जगासमोर ठेवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या पंचप्रण संकल्पनेला अनुसरून हजारो नागरिकांनी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेतली आणि या उपक्रमाची अधिकृत नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावर गेल्या नऊ दिवसांपासून हा महोत्सव सुरू होता. समारोपवेळी महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी तिसऱ्या विश्वविक्रमाची माहिती दिली. लार्जेस्ट ऑनलाईन व्हिडिओ अल्बम ऑफ पीपल रीसायटिंग ओथ/प्लेज असे या विक्रमाचे नाव आहे. केवळ चार दिवसांच्या कालावधीत २७ हजार १४० नागरिकांनी वसुंधरा संरक्षणाची शपथ घेणारे व्हिडिओ ऑनलाइन अपलोड केले होते. तांत्रिक तपासणीनंतर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने २१ हजार ४९८ व्हिडिओ वैध ठरवून नवा विक्रम घोषित केला. यापूर्वीचा विक्रम ११ हजार २५१ व्हिडिओंचा होता, जो पुणेकरांनी मोठ्या फरकाने मोडीत काढला. समारोपाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे, कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, एनबीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, अभिनेते प्रवीण तरडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. लाखो नागरिकांची उपस्थिती आणि विक्रमी पुस्तक खरेदीमुळे हा महोत्सव पुणेकरांच्या हक्काचे व्यासपीठ बनला आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांना लाभलेली गर्दी आणि युवा पिढीचा वाढता सहभाग हे महोत्सवाचे सर्वात मोठे यश ठरले आहे. या तीन विश्वविक्रमांमुळे पुणे पुस्तक महोत्सवाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, वाचन चळवळीला यामुळे नवी दिशा मिळाली आहे, अशी माहिती राजेश पांडे यांनी दिली.