प्रभात वृत्तसेवा पुणे – सलग दोन दिवसांपासून शहरासह उपनगरांत वाढत असलेला थंडीचा पारा गुरुवारी (दि. १८) एक ते दीड अंशाने घटला. त्यामुळे त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह हवेली परिसरात कडाक्याची थंडी जाणवू लागली. एनडीए, पाषाण, शिवाजीनगर, कात्रज, जांभूळवाडी आणि धायरी परिसरातही थंडीचा जोर वाढला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात सातत्याने वाढ होऊ लागल्याने ७ अंशांपर्यंत खाली आलेला थंडीचा पारा १० अंशांच्या पुढे गेला. परिणामी हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा जोर ओसरला आणि पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, बुधवारी मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर आणि धुक्याचे प्रमाणही वाढले आहे. किमान तापमानात एक ते दीड अंशाने घट झाल्यामुळे १० अंशांवर पोहोचलेला थंडीचा पार ८ अंशांपर्यंत खाली आला. हवेली परिसरात सर्वांत कमी ८.८, तर जिल्ह्यातील माळीण येथे ९.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली, तसेच शिवाजीनगर, पाषाण यासह उपनगर आणि जिल्ह्यातील किमान तापमानात एक अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा कडाका पुन्हा वाढला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. किमान तापमानात फारसा बदल होणार नसून, थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान हवेली ८.८, माळीण ९.७, पाषाण १०, तळेगाव १०.३, शिवाजीनगर १.४, दौंड १०.५, आंबेगाव १०.८, बारामती ११.५, निमगिरी १२, हडपसर १२.४, भोर १४, कोरेगाव पार्क १४.४, चिंचवड १५.३, मगरपट्टा १६ आणि वडगावशेरी १६.३ अंश सेल्सिअस.