प्रभात वृत्तसेवा पुणे – फर्गसन महाविद्यालयाच्या मैदानावरील तिसऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाला पुस्तकप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद लाभत असून, पुणेकरांकडून पुस्तकांची भरभरून खरेदी सुरू आहे. त्यामध्ये महान व्यक्तिमत्त्वांचे चरित्र ग्रंथ, वैचारिक पुस्तकांना वाचक विशेष पसंती देत आहेत.मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाने महोत्सवात प्रथमच सहभाग घेत पुस्तकांचे दालन उभारले आहे. त्यामध्ये विविध समित्यांनी प्रकाशित केलेल्या महान व्यक्तींचे चरित्रग्रंथ उपलब्ध आहेत. त्यांना वाचकांकडून भरपूर मागणी असून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवनकार्य मांडणारे चरित्रग्रंथ, विविध प्रकारचे कोश, वैचारिक पुस्तके खरेदी करण्यासाठी वाचकांची गर्दी होत आहे. याशिवाय एनबीटीतर्फे प्रकाशित बालसाहित्य, कथा, चरित्र, विज्ञान अशा विविध विषयांवरील पुस्तकांकडेही वाचकांचा ओढा दिसून येतो. प्रेरणा आणि प्रगल्भ विचार देणारी ही पुस्तके वाचकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत.पुणे पुस्तक महोत्सवात देशातील ऐंशीहून अधिक नामवंत प्रकाशकांची आठशेहून अधिक दालने पुस्तकांच्या खजिन्यांनी सजली आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भारतीय भाषांमधील उत्तमोत्तम साहित्य येथे दालनांमध्ये उपलब्ध आहे. महोत्सवात सादर होणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांची विशेष दाद मिळवित आहेत. पुणे लिट फेस्टसारखा विचारप्रवर्तक साहित्य-संस्कृतीच्या उत्सवातून ज्ञानाची गंगा अवतरली आहे.प्रकाशकांनी पुस्तकांच्या खरेदीवर आकर्षक सवलती दिल्या आहेत. आयोजकांतर्फे महोत्सवाला भेट देणाऱ्या एक लाख विद्यार्थ्यांना आनंदमठ हे पुस्तक मोफत दिले जात आहे.