प्रभात वृत्तसेवा पुणे – गीत लिहिणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. एकवेळ चित्रपटाचे गीत लिहिणे सोपे आहे. संमेलनगीत लिहिणे ही फार वेगळी बाब आहे. ९९ व्या साहित्य संमेलनाच्या गीतामधून संमेलनासारख्या महासागराचा कार्यविस्तार, रूपरेषा, संमेलन भूमीचा इतिहास, परंपरा, भवताल यांना मुठीत पकडले आहे. हे गीत म्हणजे महासागरातून दोन ओंजळी पाणी घेऊन त्या सागरालाच अर्ध्य अर्पण करण्याप्रमाणे आहे, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी काढले. सातारा येथे होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी खास संमेलनगीत तयार करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, मसाप पुणे, शाखा शाहूपुरी (सातारा) आणि मावळा फाउंडेशनतर्फे या गीताचा प्रकाशन समारंभ शुक्रवारी साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, तसेच प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलन गीतकार राजीव मुळ्ये आणि गायक विनल देशमुख उपस्थित होते.संमेलन हीदेखील एक संस्था आहे. कोणत्याही संस्थेच्या वाटचालीत बोधचिन्ह, बोधवाक्य आणि गीत यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. तो त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो. या संमेलन गीतातून साताऱ्याच्या मातीचा सुगंध दरवळतो आहे. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचा स्वभाव आणि सह्याद्रीच्या कडेकपारीतून घोंघावणाऱ्या वादळाचा प्रत्यय या गीतातून येतो. पत्री सरकारची स्थापना करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांचा कणखर बाणा या गीतात आहे. तसेच आपल्या ओघवत्या वक्तृत्वाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या सुंदर भाषेचा परिमळ यात जाणवतो. हे गीत सर्वसामान्य लोकांना संमेलनात सामावून घेत प्रेरक शक्ती देणारे ठरेल, असे प्रा. जोशी म्हणाले.कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर मुळ्ये यांनी गीताच्या रचनेमागील विवेचन केले. गायक देशमुख यांनी गीत गायले. स्नेहल दामले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पवार यांनी आभार मानले.