प्रभात वृत्तसेवा पुणे – एनडीए चौकात उभारण्यात येत असलेल्या पादचारी पुलाचा बुधवारी (दि. १४) पुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. पहिल्या टप्यातील पादचारी पूल उभारणीच्या कामामुळे महामार्गासह सेवा रस्त्यावरील वाहतुक मंदावली होती. सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.एनडीए चौकात (चांदणी चौक) नवीन उड्डाणपूल आणि रस्तारूंदीकरण कामामुळे चौकातील वाहतुक कोंडीतून मोकळा श्वास घेतला. मात्र, महामार्ग किंवा सर्व्हिस रस्त्यावर उतरल्यानंतर रस्ता ओलांडण्यासाठी प्रवाशांना सुरक्षित पादचारी मार्ग नव्हता. त्यामुळे पादचाऱ्यांना एक ते दीड किलोमिटरचा वळसा घालावा लागत होता. त्यामुळे वळसा टाळण्यासाठी काही प्रवाशी जीव धोक्यात घालून महामार्गावरूनच रस्ता ओलांडत असल्यामुळे अपघाताची भिती होती. त्यामुळे एनएचएआय आणि पुणे महापालिकेने महामार्गावर लोखंडी पादचारी पुल उभारण्याचा निर्णय घेतला. बुधवारी (दि. १४) पुलाच्या कामातील पहिला टप्पा पूर्ण झाला. पहाटेपासून पुलाचा एक भाग बसविण्यास सुरवात झाली. त्यावेळी क्रेनच्या सहाय्याने पुलाचा भाग जोडताना महामार्गावरील वाहतुक काहीवेळासाठी थांबविण्यात आली. पुलाचा भाग सुरक्षित बसल्याची खात्री झाल्यावर एक लेन सुरू करत वाहतुक सुरू केली. त्यामुळे महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यावरील वाहतुक मंदावली होती. दुपारी उशीरापर्यंत पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. दुसऱ्या टप्यातील पुल उभारणीचे कामही लवकरच पूर्ण होईल आणि पादचाऱ्यासाठी पुल खुला होईल, असे एनएचएआय प्रशासनाने सांगितले.