प्रभात वृत्तसेवा पुणे – राज्य शासनाने दिलेल्या तुकडेबंदीबाबत दिलेल्या आदेशानुसार सातबारा उताऱ्यावर नोंदी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून तलाठी, मंडल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार आता प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी म्हणजेच एक-दोन गुंठे जमिनीचे खरेदीखत झाले आहे; परंतु फेरफार झाला नाही, अशा व्यवहाराच्या नोंदी आता सातबारा उताऱ्यावर घेण्यात येणार आहे. ज्यांचे फेरफार रद्द करण्यात आले आहे, त्यांचे फेरफार नव्याने घेण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.मध्यंतरी राज्य शासनाने तुकडेबंदीसंदर्भात राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही, तसेच प्राधिकरण व प्रादेशिक आराखडा (आरपी) लागू असेल, अशा हद्दीत निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा इतर कोणत्याही अकृषिक वापरासाठी असलेल्या क्षेत्रात आणि गावांच्या हद्दीपासून 200 मीटरच्या आतील क्षेत्रात तुकडेबंदी कायदा लागू असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आता ज्यांच्या नोंदणीकृत दस्तावर आधारित फेरफार नोंदी पूर्वी ‘तुकडेबंदी’मुळे रद्द करण्यात आल्या होत्या, त्या आता पुन्हा पुनरुज्जीवित करून त्यांची नव्याने फेरफार नोंद घ्यावी. त्यानंतर सातबारा उताऱ्यामध्ये कब्जेदार सदरी खरेदीदाराचे नाव नमूद करावे. ज्यांची नावे ‘इतर हक्कात’ नोंदवून “तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार” असा शेरा मारला गेला होता, त्यांची नावे आता इतर हक्कातून काढून थेट सातबारा उताऱ्यावरील कब्जेदार सदरी नोंदवली जातील, असेही आदेशात म्हटले आहे. ज्यांनी तुकड्यांचा व्यवहार नोंदणीकृत केला आहे; पण त्यांची नोंद अजून अधिकार अभिलेखात म्हणजेच सातबारा उताऱ्यावर नाही, त्यांनी नोंदणीकृत दस्ताच्या प्रतीसह तहसीलदार कार्यालयात अर्ज करावा. त्या अर्जाच्या आधारावर फेरफार नोंद घेण्यात यावी, असेही जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे व्यवहार नियमित दि.15 नोव्हेंबर 1695 रोजी किंवा त्यानंतर दि. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे तुकडेबंदीचे व्यवहार नियमित होणार आहेत, तसेच हे व्यवहार नियमित करण्यासाठी पूर्वी अधिमूल्य आकारण्यात येत होते. तेही माफ करण्यात आले आहे.