प्रभात वृत्तसेवा पुणे – मुळशी धरणातून सात टीएमसी पाणी शहराला देण्याचा प्रस्ताव अंतिम मान्येतच्या प्रतिक्षेत असताना हे पाणी पुण्यापर्यंत कसे आणता येईल, यावरही जलसंपदा विभागाकडून विचार सुरू आहे. मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरापर्यंत आणण्यासाठी दोन पर्याय पुढे आले आहेत, त्यापैकी एक पर्याय म्हणजे पाइपलाइनद्वारे पाणी आणणे तर दुसरा पर्याय मुळशी ते खडकवासला धरणापर्यंत ३० किलोमीटर लांबीच्या बोगद्वारे पाणी आणणे. या दोनपैकी एक पर्यांयाची व्यावहारिकता तपासूनच पुढे पाऊले टाकण्यात येणार आहे.वाढते पुणे शहर, शहरालगतच्या गावांमध्ये वेगाने होणारे नागरीकरण यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. सद्यःस्थितीत पुणे शहराला खडकवासला प्रकल्प, म्हणजे खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, खडकवासला धरणातून दौंड, इंदापूर आणि हवेली तालुक्यांमधील शेतीसाठी कालव्यातून पाणी सोडण्यात येते. मागील काही वर्षांपासून भामा आसखेड धरणातून पुणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतोय. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत चालली आहे. त्यामुळे पुढील 20 वर्षांचा विचार करून मुळशी धरणातून पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर गांभीर्याने विचार सुरू आहे. मुळशी धरणातून पुणे शहरासह मुळशी तालुक्यातील गावांसाठी पाणी मिळावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे. मात्र, मुळशी धरण हे टाटा कंपनीच्या मालकीचे असल्याने या धरणातून पाणी मिळण्यास अडचणी येत आहेत. आता मुळशी धरणातून पाणी मिळण्याबाबत शासनही सकारात्मक आहे. त्यासाठी बैठकाही झाल्या आहेत. त्यामध्ये मुळशी धरणातून पाणी घेण्यास येत असलेल्या अडचणी, त्यावर काय उपाययोजना करता येतील, आदी बाबींवर चर्चा झाली. या प्रकप्पासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जात आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास पुणे शहरासह आजूबाजूच्या गावांची पाण्याची चिंता मिटणार आहे.या सात टीएमसी पाण्याचा वापर करण्यासाठी जलसंपदा विभागाने दोन पर्याय दिले आहेत. पुणे महापालिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्य सरकारकडून या पाणीवापराची मान्यता घेऊन स्वखर्चाने मुळशी प्रकल्पातून पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन तयार करणे व त्याचा वापर करणे. तर दुसरा पर्याय मुळशी ते खडकवासला धरणापर्यंत ३० किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून हे पाणी खडकवासला जलाशयात आणणे व त्याचा वापर करणे, असा दिला आहे. या प्रकल्पाचे होणारे फायदे – उन्हाळ्यात होणारी पाणी कपात थांबण्यास मदत होईल. – समाविष्ट गावे, शहरा लगतची गावे आणि वाढत्या उपनगरांना पुरेसे पाणी मिळेल. – खडकवासला प्रकल्पावरील ताण कमी होऊन पाण्याचा पर्यायी स्रोत उपलब्ध होईल.