प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका आयुक्तांच्या माॅडेल काॅलनी येथील बंगल्यातील सर्व वस्तू जागेवर असल्याचा अहवाल पालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडलेला हा प्रकार माध्यमांनी उजेडात आणल्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शहर अभियंता कार्यालयास दिले होते. त्यांच्याकडून हा अहवाल १७ नोव्हेंबर रोजी महापालिका आयुक्तांना सादर करण्यात आला. तर आयुक्त कार्यालयाकडून तो महिनाभराने म्हणजेच १५ डिसेंबर रोजी माहिती अधिकारात देण्यात आला. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्याकडून मागील दोन महिन्यांपासून या अहवालाची मागणी केली होती. मात्र, तो गोपनीय असल्याचे तसेच तो देता येणार नसल्याचे सांगत देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर दोन दिवसांपूर्वी तो वेलणकर यांना देण्यात आला असून, त्यात सर्व साहित्य जागेवर असल्याचा दावा करण्यात आला आहे. चौकशीला सहा महिने का? हा प्रकार जून महिन्यातच उडकीस आला होता. त्याबाबत वारंवार माध्यमांमध्ये याबाबत आवाज उठवला गेल्याने महापालिका आयुक्तांनी बांधकाम विभागास चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर, बांधकाम विभागाने भवन विभाग तसेच मध्यवर्ती भांडार विभाग, विद्युत विभाग तसेच घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडे पत्र पाठवत या प्रकरणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर या विभागांकडून जवळपास तीन महिने तपासणी केल्यानंतर या सर्व विभागांनी १७ नोव्हेंबर रोजी आपले अहवाल सादर केले. त्यात सर्व वस्तू जागेवर असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे, सर्व वस्तू जागेवर होत्या तर या विभागांनी तीन महिने काय तपासणी केली आणि महापालिका प्रशासनाने अहवाल सादर करण्यास सहा महिन्यांचा कालावधी का घेतला? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. “हा अहवालच हास्यास्पद आहे. यात केवळ सर्व वस्तू जागेवर आहेत असे नमूद करण्यात आले आहे. जर सगळ्या वस्तू जागेवर होत्या तर त्या तपासणीसाठी सहा तासांचा कालवधी पुरेसा होता तसेच त्याचा अहवाल सहा दिवसातही जाहीर करता आला असता. मात्र, प्रशासनाने त्यासाठी सहा महिने का घेतले याचे उत्तर देणे अपेक्षित आहे. तसेच, कोणत्या वस्तू होत्या. त्या कधी घेतल्या आहेत तसेच त्या जागेवर असल्याचे पुरावे महापालिकेने जाहीर करणे योग्य होइल.” – विवेक वेलणकर (अध्यक्ष, सजग नागरिक मंच)