प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर या संस्थेद्वारे शालेय शिक्षण विभागातील सर्व प्रकारच्या शाळांचे भौतिक ठिकाण छायाचित्रासह टॅग करून भौगोलिक तंत्रज्ञानाद्वारे सर्व माहिती एकत्रित करण्यासाठी महा स्कूल जीआयएस मोबाइल ॲप विकसित करण्यात आले आहे. सद्यस्थितीत राज्यातील १ लाख ४ हजार ३६७ शाळांचे मॅपिंग पूर्ण झाले असून, ३ हजार ७९८ शाळा अद्यापही अनमॅप आहेत. संबंधित शाळांना मॅपिंग पूर्ण करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.मोबाइल ॲपवर शाळांना त्यांचा युडायस कोड किंवा युडायस प्लसमधील संबंधित शाळांच्या मुख्याध्यापक यांनी नोंदविलेला मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन करावयाचे आहे. त्यानंतर शाळेची युडायस प्लसमध्ये भरलेली माहिती या ॲपमध्ये दिसेल. त्यानंतर शाळेचे जीआयएस लोकेशन कॅप्चर करून शाळेच्या नावासह फोटो, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड, मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृह सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा असे फोटो समाविष्ट करून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी शाळेच्या आवारात उपस्थित राहून फोटो, माहिती अद्ययावत करावयाची आहे. सर्व शाळांचे मॅपिंग कालमर्यादेत पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.क्षेत्रीय कार्यालयांनी वेळोवेळी व्हिसीद्वारे सूचना दिलेल्या असतानाही संबंधित शाळांनी मॅपिंग केलेले नसल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे संबंधितांनी शाळांचे मॅपिंग का केले नाही, याबाबत पडताळणी करण्यात येणार आहे. शाळा बंद असतील, तर संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबतची माहिती युडायस मध्ये अद्ययावत करावी लागणार आहे. शाळा अनमॅप डेटामधून कमी होतील. शाळांचे मॅपिंग करण्यासाठी अन्य काही अडचणी येत असतील, तर त्याचा आढावा घेऊन उर्वरित सर्व शाळांचे मॅपिंग तात्काळ पूर्ण करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकत्रित अहवाल मागविला मॅपिंग न केलेल्या शाळांचा अहवाल सर्व शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करावा. मॅप न होणाऱ्या शाळांचा एकत्रित अहवाल प्राथमिक शिक्षण प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी शिक्षण आयुक्तालयास सादर करावा, असे आदेश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी जारी केले आहेत.