प्रभात वृत्तसेवा पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयांतील रिक्त पदे तातडीने भरावीत, या मागणीसाठी महाराष्ट्र शिक्षण बोर्ड कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन पुकारले आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व विभागीय मंडळांमधील कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणेअंतर्गत कार्यरत असलेल्या ९ विभागीय मंडळ कार्यालयांमध्ये मंजूर असलेल्या कनिष्ठ लिपिकांच्या एकूण ५९१ पदांपैकी तब्बल ३७० पदे सध्या रिक्त आहेत. या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे कार्यरत असलेल्या मोजक्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून, कार्यालयीन कामकाजाच्या गतीवर त्याचा थेट परिणाम होत आहे. नियमित कामासोबतच अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शासनाकडे वारंवार निवेदने सादर केली. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शासन व मंडळ प्रशासनाने रिक्त पदांच्या भरतीबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनावेळी विभागीय संघटनेचे उपाध्यक्ष दत्तात्रय शिंगणे, खजिनदार वंदना मोरे, सदस्य विजय शेवाळे यांच्यासह सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.