प्रभात वृत्तसेवा पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील खासदार क्रीडा महोत्सव हा केवळ स्पर्धा नसून तरुणाईला क्रीडा माध्यमातून आरोग्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वाची संधी देणारी चळवळ आहे. पुणे ही क्रीडा संस्कृती जपणारी भूमी असून, केंद्र व राज्य सरकार, तसेच ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून पुण्याच्या क्रीडा विश्वाला नवा आयाम देण्यात येईल, असे केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी व्हर्च्युअली संवाद साधला. यामध्ये मोहोळ यांच्यासह पुण्यातील खेळाडू सहभागी झाले होते. या वेळी मोहोळ यांनी पुण्यात उपस्थित विजेत्या खेळाडूंशी थेट संवाद साधला. यामध्ये पुणे खासदार क्रीडा महोत्सवाचे मुख्य समन्वयक मनोज एरंडे, पॅरा ऑलिम्पियन संदीप सरगर, राष्ट्रीय जलतरणपटू त्विषा दीक्षित, दिव्यांग खेळाडू प्रतीक घोलप यांच्यासह ३५० हून अधिक विजेते खेळाडू पुण्यातून ऑनलाइन सहभागी झाले होते.मोहोळ म्हणाले, गावागावांतील आणि वाड्या-वस्त्यांमधील सुप्त क्रीडा कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत ‘खेलो इंडिया’च्या संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम असून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो प्रेरणादायी ठरेल. यावर्षी पुणे शहरातील ४६ हजारांहून अधिक खेळाडूंनी या महोत्सवात सहभाग घेतला. पंतप्रधानांचा खेळाडूंशी प्रेरक संवाद खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपानिमित्त पंतप्रधान मोदींनी देशभरातील खेळाडूंशी संवाद साधला. २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्यात खासदार क्रीडा महोत्सवासारखी व्यासपीठे महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन महिन्यांत देशातील १९० ठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात देशभरातून एक कोटी खेळाडूंनी सहभाग घेतला.