प्रभात वृत्तसेवा पुणे : प्रारूप मतदार यादी तयार करताना निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमध्ये सेक्शन चार्टची नावे चुकीची नोंदवल्यामुळे मतदारांची पळवापळवी झाल्याचा आरोप उमेदवार आणि कार्यकर्ते करत आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र ही चूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील असल्याचे सांगत हा गोंधळ आयोगाच्या माथी मारला आहे.पालिकेने निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. यादीवर एकत्रितपणे हरकत नोंदविण्यावर बंदी असून नागरिकांना फक्त वैयक्तिक हरकती नोंदवता येतील. त्यामुळे उमेदवारांनी मतदारांना हरकतीं नोंदविण्य़ासाठी प्रत्येक मतदाराला संपर्क साधावा लागत असून हे मोठे जिकरीचे बनले आहे. आयोगाकडून महापालिकेस प्रभाग निहाय मतदार यादीसाठी सेक्शन चार्ट दिले होते. त्याची विभागणी पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केली. या चार्टमध्ये नोंदविलेले भाग आणि याद्यांतील प्रत्यक्ष मतदारांचे भाग यांच्यात तफावत आढळत आहे. त्यामुळे इतर प्रभागातील नावे आमच्या भागात घुसडली किंवा आमच्या प्रभागातील नावे बाहेर टाकली अशा तक्रारी कार्यकर्ते करत आहे. आता ही चूक सॉफ्टवेअरची असल्याचे सांगत निवडणूक आयोगास ही बाब कळविण्यात येणार असून अंतीम निर्णय त्यांचाच असेल असे निवडणूक विभागाकडून कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे. नावे इकडची तिकडे, तिकडची इकडे प्रभाग क्रमांक ३५ (सनसिटी–माणिकबाग) च्या मतदार यादीत खेडशिवापूरचा पत्ता असलेल्या मतदारांचा समावेश दिसून येतो. प्रभाग क्रमांक २७ मधील नवी पेठेतील काही मतदारांची नावेही या प्रभागात दिसत आहेत. प्रभाग क्रमांक ७ (गोखलेनगर–वाकडेवाडी) मध्ये खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील इंदिरानगर झोपडपट्टीतील यादी क्रमांक ८२ मधील सर्व नावे समाविष्ट केली आहेत. पालिकेच्या हद्दीबाहेरच्या १२११ नावांचा समावेश झाल्याने ती ताबडतोब वगळावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.मुंढवा भागातील काही नावे वारजे परिसरातील प्रभागांमध्ये आली आहेत. त्यामुळे उमेदवारांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.