प्रभात वृत्तसेवा पुणे – जनसेवा फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या एल्डरलाइन हेल्पलाइनवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक कॉल्स आले असून, ३० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष मदत करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय, राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था आणि राज्य सरकारच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ राष्ट्रीय हेल्पलाइन ही सेवा देशभरातील सर्व राज्यात आणि केंद्रशाषित प्रदेशात वयोवृद्धांसाठी सुरू करण्यात आली आहे.मानवसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा फाउंडेशन कार्यरत आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट २०२१ पासून हेल्पलाइन सुरू झाली आहे.सून खाऊ घालत नाही आणि पोरगाही बघत नाही, घरात आम्ही दोघं एकटेच, मुलगा परदेशात आहे, नातेवाइकांनी आमचं घर बळकावलंय, कुटुंबात कुणाशी बोलणंच होत नाही, अशा असंख्य व्यथा, वेदना, तक्रारी ज्येष्ठ नागरिक एल्डरलाइन हेल्पलाइनवर मोकळेपणाने मांडत आहेत. हेल्पलाइनद्वारे आरोग्य, पोषण, निवारा, आश्रयगृह व वृद्धाश्रम, डे केअर सेंटर या मोफत सेवा मिळतात. कायदेविषयक, मालमत्ता व कौटुंबिक वादांमध्ये मोफत कायदेशीर सल्ला, पेन्शन योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम याबाबत मार्गदर्शनही केले जाते. मानसिक आजार व चिंता, ताण, राग याच्या व्यवस्थापनासाठी भावनिक आधारही दिला जातो. बेघर व अत्याचारग्रस्त वृद्धांसाठी मदत आणि पुनर्वसन, कुटुंबीयांशी संवाद, पोलीस प्रशासनाशी समन्वय, समुपदेशनही करण्यात येते. एक सुरक्षित आधार एल्डरलाइन ही केवळ हेल्पलाइन नाही, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विश्वासाचा हात, एक सुरक्षित आधार आहे. या माध्यमातून वयोवृद्धांच्या गरजा समजून घेतल्या जातात आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी आवश्यक ती मदत दिली जाते. ही सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी समाजातील प्रत्येकाने जागरूक व्हावे आणि सर्व गरजू वयोवृद्धांनी या एल्डरलाइनचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.