विश्रांतवाडी : वाघोली ते चऱ्होलीहद्दीपर्यंतचा रिंगरोड विकसित करण्यात येणार आहे. या रिंगरोडमुळे नगर रोड, सोलापूर रोड, नाशिक रोड, मुंबई रोड जोडले जाणार आहेत. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होइल. वाघोलीपासून चऱ्होली हद्दीदरम्यानच्या सुमारे साडे पाच किलोमीटर अंतराराचा रस्ता विकसित करण्यासाठी जागा ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाच्यावतीने प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी लोहगावातील स्थानिक शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत आयुक्त व शेतकरी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली. आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या बैठकीत आयुक्त नवल किशोर राम, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, बांधकाम विभागासह मनपाच्या विविध खात्याचे अधिकारी, हवेली तालुका पंचायत समितीचे माजी सभापती अशोकबापू खांदवे, गणेश खांदवे, सुधीर काळभोर, प्रवीण खांदवे, निलेश खांदवे, युवराज खांदवे, पप्पू खांदवे, प्रतीक खांदवे व लोहगावातील स्थानिक जागा मालक उपस्थित होते. यावेळी अशोकबापू खांदवे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. ते म्हणाले, ६५ मीटर रुंदीचा हा रिंगरोड असून रस्त्याच्या एका बाजूला १२ मीटर तर दुसऱ्या बाजूला २४ मीटर रुंदीचा सर्व्हिस रस्ता करण्यासाठी प्रारूप आराखड्यात आरक्षित करण्यात आला आहे. ६५ मीटर रस्त्यांमध्येच अनेक जणांच्या जमिनी व घरे बाधित होणार आहेत. त्यामध्ये अनेकजणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे दोन्ही सर्व्हिस रस्ते रद्द करण्याची मागणी लोहगावकर शेतकऱ्यांच्यावतीने खांदवे यांनी केली. ज्यांच्या जमिनी रस्त्यामध्ये बाधित होणार आहेत त्या जागा मालकांना पाच पट मोबदला द्यावा.त्या जागा मालकांच्या इतरत्र असलेल्या जमिनीवर आरक्षण टाकू नये. जरी टाकले असल्यास ते रद्द करण्यात यावे. पठारे वस्तीवरील ३६ मीटर रुंदीचा रस्ता कमी रुंदीचा करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची घरे वाचतील. रिंगरोड मध्ये बाधित होणाऱ्या एक दोन गुंठे प्लॉट धारकांना पक्क्या स्वरूपातील टीडीआर द्यावा, अशा मागण्या आयुक्तांशी झालेल्या चर्चेत अशोकबापू खांदवे यांनी केल्या आहेत. यावेळी आयुक्त नवल किशोर राम यांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे खांदवे म्हणाले.