प्रभात वृत्तसेवा पुणे – प्रभाग क्र. २२ काशेवाडी-डायसप्लाॅट मध्ये मतदारांच्या नातेवाईकांनी अर्ज करूनही मतदार यादीतील मृत व्यक्तींची नावे वगळली नसल्याची बाब काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. धक्कादायक बाब म्हणजे या मृत व्यक्तींमधे बागवे यांचे चुलते तसेच इतर दोन नातेवाईक यांचीही नावे असून दोन वेळा अर्ज करूनही ही नावे वगळण्यात आलेली नाहीत. बागवे म्हणाले की, प्रभाग क्र. २२ मध्ये ३६०० दुबार मतदार आहेत. शेजारच्या क्र. २६ मध्ये १२८७ दुबार मतदार आहेत. इतर प्रभागातील सुमारे ५ हजार २०० मतदार प्रभाग क्र. २२ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रभागातील १० हजार मतदानावर त्याचा परिणाम पडणार आहे. या भागातून अनेक मतदार स्थलांतरीत झाले असले तरी त्यांची नावे अद्यापही याच प्रभागात आहेत. या शिवाय अनेक संदिग्ध नावांचा या प्रभागात समावेश आहे. त्यामुळे या प्रभागातील यादीची फेरतपासणी करावी, दुबार नावे हटवावी तसेच मृत व्यक्तींची नावे तत्काळ कमी करण्यासह याद्यांची विभागाणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी बागवे यांनी केली आहे.