प्रभात वृत्तसेवा पुणे – सदाशिव पेठेच्या दक्षिणेला असलेल्या आंबिल ओढा झोपडपट्टीलगत असलेल्या कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साने गुरुजी वसाहतीने आणखी एक नगरसेवक शहराला दिला आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील स्वच्छ्तासेवक विमल आवळे आणि विलास आवळे यांचा मुलगा अमर आवळे हे प्रभाग क्रमांक २७ मधून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक तसेच भारतीय जनता पक्ष आणि साने गुरुजी तरुण मंडळाचा कार्यकर्ता आणि या वसाहतीत प्रत्येक घरातील कष्टकऱ्यांशी आपुलकीचा संवाद असलेला अमर आता महापालिकेत नगरसेवक म्हणून या वसाहतीचा प्रतिनिधी असणार आहे. विशेष म्हणजे या वसाहतीमधून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून जाणारा अमर हा पाचवा नगरसेवक आहे. यापूर्वी माजी नगरसेवक रमेश काळे, धनजंय जाधव, माजी नगरसेविका मनिषा घाटे, त्यानंतर भाजपचे शहरध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह आता अमर नगरसेवकपदी निवडून आला आहे.सामाजिक कार्यात विशेष गोडी असलेल्या अमरने मॅकॅनिकल डिप्लोमा केला असून, त्याचा स्वत:ची कन्सल्टंसी आहे. त्यात अमर यांची पत्नी स्नेहल या एमएसीए झालेल्या असून, त्याही अमर यांना कामात मदत करतात. तर, अमर यांना दोन मुले असून घरी दोन बहिणी आहेत. अमर हे स्वत:चे काम सांभाळत कोणतीही लाज न बाळगता स्वच्छतेच्या कामात हातभार लावतात. निवडणुकीच्या काळातही दिवसभर प्रचारात असलेले सकाळी आई-वडिलांच्या मदतीला जात होता. आता मुलगा नगरसेवक झाल्यानंतर कष्टांचं फळ मिळाल्याचं समाधान त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रूंमधून स्पष्टपणे दिसत आहे. मुलगा नगरसेवक झाल्याचा अभिमान, आनंद आणि भावुकता हे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. अमरने केलेल्या संघर्षाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला असून, मोठ्या मताधिक्याने त्याला विजयी केले असून, नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नागरिक विजयाच्या आनंदात सहभागी होत आहेत.