अभियंत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी हजारो ई-मेल पुणे – महापालिकेकडून रिक्त असलेल्या कनिष्ठ अभियंता पदासाठी येत्या १ डिसेंबर रोजी परीक्षा ठेवली आहे. ही परीक्षा पुढे ढकलावी, या मागणीसाठी अर्ज भरलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी एकाच वेळी महापालिकेच्या विविध विभागांच्या ई-मेल आयडीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारे ई-मेल पाठवले आहेत. त्यामुळे अनेक विभागांचे मेल बॉक्स पूर्णपणे भरून गेले असून, दैनंदिन कामकाज तसेच आदेशांचे ई-मेल आणि इतर तक्रारी शोधणे कर्मचाऱ्यांना अवघड झाले आहे. त्यातच हे सर्व मेल डिलिट करणे शक्य नसल्याने इतर माहिती शोधताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. महापालिकेकडून अभियांत्रिकीच्या रिक्त असलेल्या सुमारे १७१ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या अर्जदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी सध्या विविध शासकीय विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांना निवडणुकीसाठीची ड्यूटी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना १ डिसेंबर रोजी परीक्षा देणे शक्य होणार नाही, अशी व्यावहारिक अडचण त्यांच्याकडून मांडली आहे. याशिवाय, अनेक उमेदवारांना घरापासून ४०० ते ५०० किलोमीटर अंतरावरची परीक्षा केंद्रे देण्यात आली आहेत. त्यामुळे १ डिसेंबरला परीक्षा देऊन दुसऱ्याच दिवशी २ डिसेंबरला नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी पोहोचणे त्यांना शक्य नाही, असेही विद्यार्थी सांगत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत संवेदनशीलता दाखवावी आणि परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून सातत्याने होत आहे. या मागणीचे ई-मेल एका संघटनेने अथवा काही विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समन्वयाने एकाच वेळी हजारोंच्या संख्येने विविध विभागांच्या ई-मेल आयडीवर पाठवले आहेत. यामुळे प्रशासनाचे इतर कामकाज सुरळीत पार पाडणे अवघड झाले असून, हा प्रकार महापालिकेत चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.