निवडणुकांमुळे सादर होण्याची शक्यता कमीच पुणे – महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे, महापालिका आयुक्तांकडून पुढील आर्थिक वर्षासाठी (२०२६-२७) साठी सादर केले जाणारे अंदाजपत्रक लांबणीवर पडणार आहे. तर, डिसेंबर महिन्यातच आचारसंहिता लागल्यास नवीन सभागृह आल्यानंतरच आयुक्तांकडून अंदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्तांकडून दरवर्षी २० जानेवारीपूर्वी महापालिकेचे अंदाजपत्रक सादर केले जाते. त्यानंतर स्थायी समितीकडून त्यात बदल करीत फेब्रुवारी अखेर या अंदाजपत्रकास मान्यता दिली जाते. महापालिकेवर मागील तीन वर्षांपासून प्रशासक असल्याने आयुक्तांकडूनच या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. त्यासाठी आयुक्तांकडून डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच अंदाजपत्रकासाठी बैठका घेतल्या जातात. मात्र, आयुक्तांकडून यंदा अद्यापही अंदाजपत्रकाची एकही बैठक घेण्यात आलेली नाही. तसेच, आढावा घेण्यात आलेला नाही. निवडणुकीपूर्वीच्या प्रक्रिया प्रशासनाकडून पूर्ण करण्यात येत असल्याने प्रशासनाकडून त्यानुसार आढावा घेतला जात आहे. परिणामी अंदाजपत्रकाचे काम मागे पडले आहे. महापालिकेवर प्रशासक नियुक्तीनंतरचे हे चौथे अंदाजपत्रक असणार असून मागील तीन वर्षे ते फुगविण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात मिळणारे उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत असून, महापालिकेची अंदाजपत्रकीय तूट ३ हजार कोटींपेक्षा अधिक झाली आहे. नवीन सभागृहालाच सादर करणार महापालिका निवडणुकीसाठीची आचारसंहिता २० डिसेंबरनंतर लागण्याची शक्यता आहे. त्यातच आचारसंहिता सुरू असताना प्रशासनास अंदाजपत्रक सादर करता येत नाही. परिणामी, निवडणुकांचा निकाल झाल्यानंतरच आयुक्तांकडून नवीन स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर केले जाण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यानंतर स्थायी समिती त्यात बदल करून मार्च अखेरपर्यंत आपले अंदाजपत्रक सादर करेल असेही सांगण्य़ात येत आहे.