Pune Metro – पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरासाठी सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय ठरत असलेली मेट्रो सेवा शहराच्या चारही दिशांना वर्तुळाकार स्वरूपात विस्तार केली जाणार आहे. त्याअंतर्गत आता वाकड- कात्रज- शेवाळेवाडी या मार्गावर व्यवहार्यता अहवाल (फिजिबिलीटी रिपोर्ट) तयार करण्यात यावा, असे पत्र महापालिकेच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाकडून महामेट्रोला देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी मेट्रो प्रकल्पांच्या आढावा बैठकीत खासदार मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतच्या सूचना प्रशासनास केल्या होत्या. त्यानंतर आता महापालिकेकडून याबाबतचे पत्र नुकतेच महामेट्रोला देण्यात आल्याची माहिती प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी सांगितले. या अहवालात प्रामुख्याने उद्दिष्टे, गरज आणि अपेक्षित परिणाम,जागा, साधनसामग्री, तंत्रज्ञान, मनुष्यबळ उपलब्धता, अंदाजित खर्च, संभाव्य अडचणी अशा वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जातो. दक्षिण पुण्याचा भाग जोडला जाणार शहरात सध्या कात्रज ते निगडी आणि चांदणी चौक ते वाघोली असा विस्तारीत मेट्रो मार्ग सुरू आहे. त्यासोबत आता हिंजवडी ते शिवाजीनगर हा मार्ग पुढे लोणी काळभोरपर्यंत विस्तारण्याचे नियोजन आहे. त्याच वेळी खडकवासला ते वाघोली प्रकल्पाचेही काम लवकरच सुरू होणार आहे. अशा स्थितीत आता वाकड ते शेवाळेवाडी मार्ग झाल्यास शहराचा बहुतांश दक्षिण भागासाठी मेट्रोची वर्तुळाकार सेवा तयार होणार आहे. वाकड ते कात्रज हा मार्ग थेट पुणे- बेंगलोर महामार्गाच्या कडेने असणार आहे, तर पुढे तो कात्रज बाह्यवळन मार्गाने कात्रज- कोंढवा, मंतरवाडी, फुरसुंगी आणि पुढे शेवाळवाडीपर्यंत गेल्यास तो वर्तुळाकार होणार आहे. त्यामुळे हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.