शनिपाराजवळची घटना, १० अग्निशमन वाहनांनी तासात आणली आग आटोक्यात पुणे : -मध्यवस्तीततील सदाशिव पेठेतील शनिपार चौकाजवळील प्रसिद्ध रमेश डाईंग या दुकानाला दुपारी भीषण आग लागली. १० अग्निशमन वाहने तसेच एक हायड्रॉलिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन दल आल्यावर तीन मजली इमारतीच्या टेरेसवरील पञ्याच्या शेड आणि सोलर पॅनलच्या भागातून मोठ्या प्रमाणात धूर, ज्वाळा उसळत होत्या. जवानांनी बी.ए. सेट (श्वसन उपकरणे) परिधान करून आत प्रवेश केला व आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी येत असल्याने शेजारील शहा ब्रदर्स दुकानातून लोखंडी पत्रे काढून तेथूनही पाण्याचा मारा केला. जवानांनी वेळेत दक्षता घेतल्याने आग इतर दुकाने व खालच्या मजल्यांपर्यंत पसरली नाही. एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आली. आगीत दुकानातील स्वेटर, रेनकोट, शाळेच्या पिशव्या, सुटकेसेस आणि इतर साहित्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दल मुख्यालय, कसबा पेठ, जनता विजापूरकर हॉस्पिटल विभाग, एरंडवणा स्टेशन, वॉटर टँकर्स, हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म, १०८ रुग्णवाहिकांचा वापर झाला. पोलीस व महावितरणचे कर्मचाऱ्यासह बचाव कार्यात अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप तसेच ५० जवानांनी भाग घेतला. शनिपार परिसरात दाटवस्ती आहे, तसेच अनेक दुकाने या भागात आहेत. आग लागल्यानंतर मोठा धूर झाला होता. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी