सहापैकी तीन रस्त्यासाठी एकच निविदा, बाकीच्या रस्त्यासाठी शून्य पुणे – शहरातील सहा महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या रस्त्यांवर पे अँड पार्क योजना राबविण्यासाठी पालिकेने काढलेल्या निविदांना अल्पप्रतिसाद मिळाल्याने पालिकेवर फेरनिविदा काढण्याची वेळ आली आहे. निविदांमध्ये तीन रस्त्यांसाठी एकाच ठेकेदाराची निविदा आली असून उर्वरित तीन रस्त्यांसाठी एकही निविदा नाही. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिकेने मुख्य रस्त्यांवर पे ॲंड पार्क योजना प्रस्तावित केली होती. त्याला मुख्यसभेने मान्यता दिल्यानंतरही गेल्या सात वर्षांत त्याची अंमलबजावणी झाली नाही. वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असल्याने पालिकेने जंगली महाराज रस्ता, नामदार गोखले (फर्ग्युसन) रस्ता, लक्ष्मी रस्ता, बिबवेवाडी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट आणि विमाननगर रस्ता या सहा मार्गांवर निविदा प्रक्रिया राबवली. मात्र, जंगली महाराज रस्ता, गोखले रस्ता आणि विमाननगर रस्ता या मार्गांसाठी केवळ एक निविदा दाखल झाली तर लक्ष्मी रस्ता, बालेवाडी हायस्ट्रीट आणि बिबवेवाडी रस्त्यासाठी एकही निविदा आलेली नाही. नियमांनुसार एकच निविदा प्राप्त झाल्यास फेरनिविदा काढणे बंधनकारक आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिस एकत्रितपणे प्रयत्नशील आहेत. प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण तसेच बेशिस्त पार्किंगमुळे निर्माण होणारी कोंडी कमी करण्यासाठी पे अँड पार्क योजना महत्त्वाची ठरणार होती. पे ॲंड पार्क योजनेसाठी निविदा काढल्या होत्या. त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे फेरनिविदा काढल्या जाणार असून, अंमलबजावणीस उशीर होणार आहे. या योजनेत रस्त्यावर गाडी लावणाऱ्या ग्राहकांकडून रोख रकमेऐवजी डिजिटल माध्यमातूनच शुल्क आकारणेही बंधनकारक असणार आहे. – दिनकर गोजारे (प्रकल्प विभागप्रमुख)